+91 989 095 9698

info@kolhapurtimes.com

Breaking News

blog

ठेकेदारांनो रस्त्यांचा दर्जा चांगला करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा – कोल्हापूरकरांचा इशारा

कोल्हापूर - कोल्हापुरात पडलेल्या मुसळधार पावसानं शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झालीय. महत्वाच्या वाहतूक मार्गावरच मोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतोय. खराब रस्त्यामुळं गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय नागरिकांना विविध शारीरिक आजारांना सामोरं जावं लागतयं. त्यामुळे यापुढे करण्यात येणारे रस्ते भ्रष्टाचार न करता दर्जेदार करावेत अन्यथा संबंधीत ठेकेदारावर जनताच कायदेशीर कारवाई करेल अशी भावना शहरवासियांतून व्यक्त होतेय.


कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. या पावसामुळे शहरातीअंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी रस्त्यांची खुदाई केल्यानं अनेक मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. ही वाहतूक अंतर्गत रस्त्यावरून वळवल्याने संबंधित मार्गावर मोठे खड्डे पडले आहे. यामुळं वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करवा लागतोय. रस्त्यावरील धुळीनं वाहनधारकांबरोबरच नागरिक आणि व्यापारीही त्रस्त झालेत. खड्ड्यांमुळे गाड्यांचं मोठं नुकसान होत आहे. परिणामी वाहनधारकांना कंबरदुखी पाठदुखी श्वसनाचे विकार यासारख्या अन्य आजारांना सामोरं जावं लागतंय. महापालिका स्थायी समिती सभापतींनी पंधरा दिवसात रस्ते करण्याचे आदेश दिले आहेत. या रस्त्याचे काम काही ठिकाणी सुरू केलं आहे. याबाबत शहरवासियांतून विविध प्रतिक्रीया उमटत आहेत.


ठेकेदार चांगल्या प्रतीचे मटेरियल वापरून दर्जेदार रस्ते तयार करत नाहीत. तसंच लोकप्रतिनीधी आणि ठेकेदार यांच्यातील आर्थिक वाटाघाटीमुळं रस्त्यांच्या दर्जाकडं जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची शंका आहे.            – सुशिल चावरे, व्यावसायिक

मुदतीच्या आत रस्ता खराब झाला तर संबंधीत ठेकेदारावर कायदशीर कारवाईसाठी योग्य त्या न्यायालयात दाद मागण्यात येईल. तर रस्तेकामाबाबत दुर्लक्ष करून नागरिकांची दिशाभूल केल्याबद्दल लोकप्रतिनिधींना येत्या महापालिका निवडणुकीत नागरीक जाब विचारतील - ॲड. योगेश मांडरे

रस्ते करताना ठेकेदाराने ज्या रस्त्याचे काम करणार आहे, त्याबाबतचे सविस्तर वर्णन, खर्च व मुदत अशी सविस्तर माहिती असणारा डिजिटल फलक त्या ठिकाणी लावावा – योगेश केंबळकर, नोकरदार

एकंदरीतंच मूलभूत सुविधांबाबत कोल्हापुरची जनता जागरूक झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळं महापालिका आयुक्तांनी शहरवासीयांच्या या मागण्यांची गंभीर दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे.