आष्टा येथे बिबट्याचे दर्शन; दोन दुचाकीस्वार जखमी!

आष्टा (सलीम शेख ) : शहरात बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी राज पेट्रोल पंपाजवळ एका दुचाकीला बिबट्याने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री घडली. बिबट्या अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीवरील चालकाला त्याला टाळता आले नाही. बिबट्याची धडक बसल्याने दुचाकीस्वार खाली पडले आणि जखमी झाले. या घटनेनंतर बिबट्या गर्दीचा फायदा घेत अंधारात पसार झाला.
शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वन विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. वन विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असून, नागरिकांना रात्री घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
यापूर्वीही शहरालगतच्या ग्रामीण भागात बिबट्या दिसल्याच्या घटना घडल्या होत्या, परंतु शहराच्या मुख्य वस्तीत बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. वन विभाग बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.