भुदरगडचे मराठा आंदोलक मुंबईच्या आझाद मैदानात दाखल!

गारगोटी (सलीम शेख ) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भुदरगड तालुक्यातून अनेक मराठा बांधव सहभागी झाले आहेत. गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष पद्धतीने मुंबई गाठली आहे.
या आंदोलकांना मुंबईला जाण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. मात्र, प्रशासनाच्या या प्रयत्नांना चकमा देत, भुदरगड तालुक्यातील मराठा बांधवांनी ‘गनिमी कावा’ तंत्राचा वापर केला. गारगोटीतून चारचाकी वाहनांनी प्रवास करत त्यांनी लोणावळ्यापर्यंतचे अंतर कापले. त्यानंतर, काही अंतर पायी चालत आणि नंतर रेल्वेने प्रवास करून ते मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचले.
गारगोटीतून या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड सम्राट मोरे, सरपंच प्रकाश वास्कर, रमेश माने, अनिल देसाई, आणि संतोष पाटील यांनी केले. सकाळीच हे सर्वजण आझाद मैदानावर दाखल झाले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.
या विशेष प्रवासाने भुदरगड तालुक्यातील मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी असलेले त्यांचे समर्पण आणि निश्चय पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यांच्या या कृतीमुळे मराठा आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे.




