महाराष्ट्र ग्रामीण

धुंदवडे येथे मोकाट गुरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मदतीची मागणी!

धुंदवडे (प्रतिनिधी): गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे गाव सध्या मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे मोठ्या संकटात सापडले आहे. कावळटेक धनगरवाडा येथील शेकडो गायी आणि रानगवे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने हस्तक्षेप करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके जनावरांमुळे फस्त होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
धुंदवडे गावाजवळ असलेल्या कावळटेक धनगरवाडा येथे काही वर्षांपूर्वी तीस ते चाळीस धनगर कुटुंबे राहत होती. उपजीविकेच्या शोधात ही कुटुंबे आता कोल्हापूरसारख्या शहरांकडे स्थलांतरित झाली आहेत. शहराकडे जाताना, त्यांनी आपली जनावरे गायी व त्यांची वासरे त्याच माळरानावर सोडून दिल्या. आता या गायींची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे.
अन्नाच्या शोधात या गायी कावळटेक धनगरवाड्यावरून खाली गावात शेतात येऊ लागल्या आहेत. उन्हाळ्यात त्या ऊस पिके, मका आणि हत्ती गवताचा पूर्णपणे फडशा पाडतात, तर पावसाळ्यात नव्याने लावलेली भात पिके पूर्णपणे खाऊन टाकत आहेत. या गायींसोबत रानगवे देखील भात पिकांचे मोठे नुकसान करत आहेत.
शेतकऱ्यांची भीती आणि आर्थिक नुकसान
या मोकाट जनावरांमुळे धुंदवडे येथील शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. ही जनावरे अनेकदा शेतातच मुक्काम करतात. शेतात राखणीसाठी गेलेले शेतकरी या गायी आणि गवारेड्यांच्या हल्ल्याच्या भीतीने शेतात जाणे टाळत आहेत. कष्ट करून पिकवलेले हाता-तोंडाशी आलेले पीक जनावरांमुळे पूर्णपणे वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धुंदवडे येथील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी वनविभागाकडे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मागण्या केल्या आहेत मोकाट गायी आणि गवारेड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.जनावरांनी खाल्लेल्या भात पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
या गंभीर समस्येकडे वनविभागाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी धुंदवडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button