जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड योजनेचा विस्तार!

दुंधवडे (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या माध्यमातून गारीवडे ता. गगन बावडा येथे बांधावर नारळ लागवड करण्यात आली. ‘जिथे ऊस… तिथे बांधावर नारळ लागवड’ या अभिनव योजनेचा उद्देश केवळ वृक्षारोपण नव्हे, तर शाश्वत शेतीचा पाया मजबूत करणे आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना ऊसाच्या बांधावर नारळ लागवड करून दुहेरी उत्पन्नाचा मार्ग खुला होणार आहे. गारीवडे येथील ५० शेतकऱ्यांच्या ऊस क्षेत्रावर नारळ लागवड केली जाणार आहे. तुकाराम पाडावे व धोंडीराम कदम यांच्या शेतावर नारळ रोपांची लागवड करून योजनेचा प्रारंभ झाला . महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ऊसासोबत नारळ लागवड केल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल. जमिनीचा कार्यक्षम वापर व बांधावरील मोकळी जागा उपयुक्त ठरणार आहे.
नारळ हे कमी पाण्यात टिकणारे पीक असल्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होईल.
ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत काळे, सहायक कृषी अधिकारी सौरभ पाटील, सरपंच संतोष पाटील, ग्रा पं अधिकारी उत्तम कामिरे, सीमा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.