गणेशोत्सवाची धूमधडाक्यात सुरुवात! कोल्हापूर बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलल्या!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठांमध्ये भाविकांची तुंबड गर्दी पाहायला मिळत आहे. गणेश मूर्तींची बुकिंग, पूजेचे साहित्य, सजावटीचे मखर, विद्युत माळा, नैवेद्याचे साखरफुटाणे, बत्ताशा यांसारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत बाजारात जागत आहेत. कागल बाजारपेठ, गंगावेश, बापट कॅम्प, शाहूपुरी येथे खरेदीचा उत्साह आहे.रवीवारी बाजारात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्ते मंडप सजावटीसाठी रात्रभर मेहनत घेत आहेत. मूर्तिकार गणेशमूर्तींवर अंतिम हात फिरवत असून कारागीरांचीही धावपळ सुरू आहे.
सामान्य ते श्रीमंत सर्वांचे बाप्पावर प्रेम आहे.गणेश चतुर्थी हा सण सामाजिक समरसतेचे प्रतीक मानला जातो. सामान्य नागरिक असो वा श्रीमंत, प्रत्येकजण आपल्या परिने हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. घराघरात गणेशाची स्थापना केली जाते आणि दहा दिवस भाविक मनोभावे पूजा-अर्चा करतात. सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, आरास स्पर्धा यामुळे वातावरण भक्तिमय होते.
वाहतूक कोंडी आणि सुरक्षेची तयारी सुरू झाली आहे.कागल,गंगावेश, बापट कॅम्प परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून स्थानिक प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. पोलिस आणि स्वयंसेवक गर्दी नियंत्रणासाठी सज्ज झाले आहेत.यंदा गणेश चतुर्थी बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी केली जाणार असून अनंत चतुर्दशीला म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी बाप्पांचे विसर्जन होईल. या दहा दिवसांत महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात गणेशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.