गोकुळ शिरगाव स्मशानभूमीला लाकडांचे दान!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत (MIDC) ने एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत, औद्योगिक वसाहतीमधील पडलेली झाडे आणि फांद्या गोकुळ शिरगाव येथील स्मशानभूमीला दान केल्या आहेत. या उपक्रमामुळे औद्योगिक वसाहतीची स्वच्छता तर झालीच, शिवाय स्मशानभूमीसाठी आवश्यक लाकडांची सोय झाली.
हा उपक्रम कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक आणि उप अभियंता अजय कुमार रानगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या वेळी गोकुळ शिरगाव येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सरपंच चंद्रकांत डावरे, उपसरपंच संदीप शहाजी पाटील, सदस्य रणजीत पाटील, सतीश एरंडोले, तसेच गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, उपाध्यक्ष सुनील शेळके, मानद सचिव संजय देशिंगे, खजिनदार अमोल यादव आणि कोल्हापूर फौंड्री अँड इंजिनियरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी सांगितले की, “औद्योगिक वसाहतीत अनेकदा पडलेली लाकडं आणि फांद्या वाया जातात. त्यांचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी व्हावा या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे औद्योगिक वसाहत आणि स्थानिक ग्रामपंचायत यांच्यातील संबंध अधिक घट्ट होतील.”
एमआयडीसीने राबवलेल्या या उपक्रमामुळे औद्योगिक वसाहतीची स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्ही गोष्टी साध्य झाल्याचे दिसून आले आहे.




