महाराष्ट्र ग्रामीण

शेतजमिनीचा रस्ता बंद केल्याने शेतकरी त्रस्त; १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा!

कोल्हापूर (सलीम शेख): करवीर तालुक्यातील मौजे केर्ली येथील गट क्रमांक ३२३ मधील शेतरस्ता खुला करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका माजी सैनिकाने स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
संभाजी बबन आगलावे असं या माजी सैनिकाचं नाव असून, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनातून आपली व्यथा मांडली आहे. आगलावे यांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ३२३ मध्ये जाण्यासाठी असलेला शेतरस्ता केदार यशवंत नलवडे आणि इतरांनी खडी, फ्रेशर आणि चिऱ्याची भिंत घालून बंद केला आहे. त्यामुळे त्यांना शेतीत ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत.
याबाबत आगलावे यांनी करवीर तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार, २५ ऑक्टोबर २०२४ रोजी तहसीलदार यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचं पालन झालेलं नाही. मंडल अधिकारी, निगवे धुमाला यांनी तीन वेळा (४ मार्च २०२५, २१ मार्च २०२५ आणि १४ जुलै २०२५) तारखा देऊनही रस्ता खुला झालेला नाही. याबद्दल विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचं आगलावे यांनी सांगितलं.
प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या आगलावे यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनासोबत आगलावे यांनी ग्रामपंचायत तक्रार अर्ज, मंडल अधिकाऱ्यांचा आदेश आणि नायब तहसीलदारांच्या आदेशाच्या प्रती जोडल्या आहेत. या निवेदनाची प्रत तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button