शौर्यपदक विजेते तानाजी सावंत यांची कोल्हापूर येथे पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती!

कोल्हापूर (सलीम शेख): धाडसी कामगिरीसाठी राष्ट्रपती शौर्यपदक विजेते आणि पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी तानाजी दिगंबर सावंत यांची कोल्हापूर पोलीस मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक (गृह) म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारला असून, त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
माजी पोलीस निरीक्षक सावंत यांनी एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) मध्ये कार्यरत असताना अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल केली होती. विशेषतः २०१८ मध्ये किणी टोल नाक्यावर राजस्थानमधील बिष्णोई टोळीला पकडताना त्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य उल्लेखनीय आहे. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी गोळीबाराला सामोरे जात तीन सराईत गुन्हेगारांना जखमी अवस्थेत जिवंत पकडले होते. या शौर्याबद्दल त्यांना २०२३ मध्ये राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले होते आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना ते प्रदान करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक म्हणून तानाजी सावंत यांच्या नियुक्तीचे कोल्हापूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात येत आहे. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली. यामध्ये डॉ. सचिन जिरगे, समाजसेवक आसिफ मुल्ला, एस. आर. पाटील टॅक्स कन्सल्टंट, महादेव घाटगे(घाटगे सरकार), संजय दिंडे पोलीस मित्र, सलीम शेख, अवधूत गाडेकर अशा अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांनी सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मान्यवरांनी तानाजी सावंत यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल असे मत व्यक्त केले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली कोल्हापूर पोलीस दलाची कामगिरी अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला. या नियुक्तीला कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक ‘आनंदाची पर्वणी’ मानले जात आहे.