कोल्हापूरमध्ये रिव्हॉल्वरसह तिघांना अटक, ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : आगामी गणेशोत्सव आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ₹१ लाख २० हजार ५५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार, LCB चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे विक्रमनगर परिसरातून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून भारतीय बनावटीचे रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले.
या प्रकरणात अधिक तपास केला असता, आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, विशाल खराडे, संतोष बरगे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, परशुराम गुजरे आणि सतीश सूर्यवंशी या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.