‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट १९ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित! एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा – प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे!

कोल्हापूर : आतली बातमी फुटली’ – एक विनोदी रहस्यमय कथा, ‘वीजी फिल्म्स’च्या बॅनरखाली दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. हा सिनेमा नवरा-बायकोच्या नात्यातील एका गुंतागुंतीच्या कथेवर आधारित आहे. जेव्हा त्यांच्या नात्यात कटुता येते आणि परिस्थिती खुनाच्या सुपारीपर्यंत पोहोचते, तेव्हा काय गोंधळ होतो, हे विनोदी पद्धतीने यात दाखवण्यात आलं आहे. ही कथा रहस्यमय वळणे घेत प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल, असा विश्वास दिग्दर्शक विशाल पी. गांधी यांनी व्यक्त केला आहे.
या चित्रपटात प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी आहे. मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, आणि सिद्धार्थ जाधव हे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, आणि त्रिशा ठोसर यांसारखे कलाकारही आहेत. या सर्व कलाकारांची जुळून आलेली केमिस्ट्री आणि खिळवून ठेवणारी कथा यामुळे हा चित्रपट मनोरंजक ठरेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटातील ‘सखूबाई’ आणि ‘चंद्राची गोष्ट’ ही दोन्ही गाणी सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे या गाण्यांनीही प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. ‘आतली बातमी फुटली’ची निर्मिती विशाल पी. गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांनी केली आहे, तर सहनिर्माता अम्मन अडवाणी आहेत. या चित्रपटाचे वितरण ‘फिल्मास्त्र स्टुडिओज’ने केले आहे. हा कॉमेडी क्राइम चित्रपट १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे.