गॅस पाइपलाइन स्फोटात एका महिलेचा मृत्यू; आमदार अमल महाडिक यांनी घेतली जखमींची भेट!

कोल्हापूर (सलीम शेख )- कळंबा जेल परिसरातील मनोरमा कॉलनी येथे राहणाऱ्या भोजणे कुटुंबाच्या घरात गॅस पाइपलाइनचा स्फोट झाल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत शीतल भोजणे (वय ३८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या स्फोटात त्यांचे पती प्रज्वल भोजणे (वय ४५), मुलगी इशिका भोजणे (वय ८) आणि मुलगा अनंत भोजणे (वय १५) हेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमल महाडिक यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि भोजणे कुटुंबाला धीर दिला.
ही घटना शनिवारी सकाळी घडली. गॅस पाइपलाइनमधून गॅस गळती झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोट इतका जोरदार होता की घरात मोठे नुकसान झाले. यात कुटुंबातील चारही सदस्य गंभीर भाजले. त्यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, शीतल भोजणे यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना वाचवता आले नाही.
आमदार महाडिक यांनी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांबाबत माहिती घेतली आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




