ग्रामीण रुग्णालयातील मनमानी कारभाराची चौकशी करून तातडीने उपाययोजना करा: किसान काँग्रेसची मागणी!

कोल्हापूर (प्रतिनिधी): ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनेकदा मनमानी कारभार चालतो, रुग्णांची हेळसांड होते आणि नियमांना बगल देऊन काम केले जाते, असा आरोप करत किसान काँग्रेसने या गैरसोयींची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आरोग्य सेवा उपसंचालक श्री. दिलीप माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात, ग्रामीण रुग्णालयांमध्ये कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात, त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत बसावे लागते, असे म्हटले आहे. या अनागोंदी कारभाराला आळा घालून रुग्णांना योग्य आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात गंभीर तक्रार समोर आली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवेत अनेक ठिकाणी रुग्णालये नियमबाह्य पद्धतीने चालवली जात असल्याचे निदर्शनास आले असून, त्याविरोधात कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
२३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या भेटीत गंभीर परिस्थिती आढळून आली. औषध विभाग (पेपर विभाग) बंद अवस्थेत होता, तसेच रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. त्यावेळी केवळ एक शिपाई व एक नर्सच कार्यरत असल्याचे आढळून आले. यामुळे ओपीडी क्रमांक ४ ते ६ बंद स्थितीत होती.
या प्रकारामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली. या संदर्भातील छायाचित्रे व माहिती जिल्हा किसान काँग्रेसकडे उपलब्ध असून, ते समाजमाध्यमांवरही प्रसारित झाले आहेत. या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अशा प्रकारच्या मनमानी व निष्काळजीपणावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदन दिले असून, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर, युवराज उलपे, मिलिंद पाटील, संजय पटकारे, रणजीत पाटील, शरद वासकर, प्रवीण दंडवते, शैलेश कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा अभाव सहन करावा लागत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.




