मुंबई: देशभरात ‘संजीवनी २०२५’ मोहीम सक्रिय; कर्करोगाच्या लवकर तपासणीसाठी जनजागृतीवर भर!

मुंबई ( कोल्हापूर टाइम्स न्यूज नेटवर्क) : भारतात झपाट्याने वाढणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळावे यासाठी, फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन, न्यूज18 नेटवर्क आणि टाटा ट्रस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संजीवनी’ राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेतला. यावर्षी देशात कर्करोग रुग्णांची संख्या १५.७ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, त्यापैकी ७० टक्के रुग्णांचे निदान उशिराच्या टप्प्यावर होत असल्यामुळे ही मोहीम ‘जागरूकतेपलीकडे जाऊन कृती करण्या’वर भर देत आहे.प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन या ‘संजीवनी’ मोहिमेच्या प्रमुख पुरस्कर्त्या आहेत. परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, “आपण आपल्या आरोग्याची काळजी फक्त मोठा आजार आल्यावरच घेतो, हे चुकीचे आहे. संकट येण्याची वाट न पाहता आधीपासूनच स्वतःची काळजी घ्यायला हवी. कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास त्याला तोंड देण्याची शक्ती, वेळ आणि आशा मिळते.” यावेळी त्यांनी ‘अंतरात्मा’ या विशेष रॅम्प शोमध्ये कर्करोगातून बरे झालेल्यांसोबत सहभाग घेतला. या शोमधील व्यक्तींनी कर्करोगावर मात करून पुन्हा व्यावसायिक, पालक आणि शिक्षक म्हणून जीवन जगत असल्याचा सकारात्मक संदेश दिला.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “सरकार आणि समाज एकत्र आल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करणे शक्य आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कर्करोगाच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी कटिबद्ध आहे.” त्यांनी महात्मा फुले आरोग्य मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील २.५ कोटी महिलांची स्तन, तोंड आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी केल्याचे सांगितले, ज्यामुळे लवकर निदान आणि उपचार शक्य झाले आहेत. त्यांनी सर्वांना या मोहिमेत सहभागी होऊन जीव वाचवण्याचे आवाहन केले.
‘संजीवनी’ मोहीम गेल्या ७०० दिवसांपासून सक्रिय असून, तिने न्यूज18 नेटवर्कद्वारे ६० कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचून १.३ कोटींहून अधिक डिजिटल संवाद साधले आहेत. या मोहिमेअंतर्गत कर्करोग तपासणी शिबिरे, शालेय कार्यशाळा आणि कॉर्पोरेट आरोग्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. फेडरल बँकेचे सीईओ के.व्ही.एस. मणियन यांनी यावर्षी आणखी २०,००० लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘टाटा ट्रस्ट्स’चे सीईओ सिद्धार्थ शर्मा यांनी लवकर तपासणीला एक ‘नैतिक जबाबदारी’ म्हटले आहे. ‘नेटवर्क18’चे अविनाश कौल यांनी, ‘संजीवनी’ चळवळ ही केवळ दानधर्म नसून, कर्करोग सेवेचे नवे परिमाण घडवण्याची सामूहिक बांधिलकी असल्याचे सांगितले.
तपासणी आणि प्रतिबंध हे रोजच्या आरोग्यप्रक्रियेचा भाग बनवणे आहे. यासाठी ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये थेट जनसंपर्क मोहिमांद्वारे विस्तार केला जाईल. या मोहिमेत शाळांमधील मुली, रोजंदारीवरील कामगार आणि असंघटित क्षेत्रातील महिलांना लक्ष्य केले जाईल. कर्करोगाविषयीची भीती आणि गैरसमज दूर करून, लवकर निदान ही एक ‘नवी सवय’ समाजात रुढ करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘संजीवनी’चा खरा ठसा हजारो जीव वाचवून ‘भीती आणि हानी’च्या जागी ‘स्वाभिमान, जगणे आणि नवी आशा’ निर्माण करण्याचा आहे. प्रत्येक तपासणी एका जीवाला वाचवण्याची संधी आहे, असा संदेश ही मोहीम देत आहे.