मंगळवार पेठेतील भाजी मंडई अध्यक्ष अजिंक्य मस्कर यांच्यावर हल्ला; मनसेचा तीव्र निषेध

कोल्हापूर (सलीम शेख ) : मंगळवार पेठेतील भाजी मंडई अध्यक्ष अजिंक्य मस्कर यांच्यावर काही विक्रेत्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. मस्कर हे मंडईच्या व्यवस्थापन आणि विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे काही विक्रेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
सणावाराचा दिवस असल्यामुळे मंडईत गर्दी कमी होती. याच वेळी काही विक्रेत्यांनी मस्कर यांच्यावर बेसावध अवस्थेत हल्ला चढवला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू जाधव व मनसे कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “स्थानिक नागरिकांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने जर कारवाई केली नाही, तर आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.”
पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने सर्व पक्षांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.