मुरगूड नगरपालिकेच्या कारभारावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आरोप; दलित वस्तीतील कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!

मुरगूड (प्रतिनिधी): मुरगूड नगरपालिकेला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मोठा दिमाखदार कार्यक्रम पार पडला असला तरी, दलित वस्ती सुधार योजनेखाली मिळालेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने केला आहे. पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासो भरमा कांबळे यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केले असून, निधी असूनही दलित वस्तीतील कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, मुरगूड नगरपालिकेला दलित सुधार योजनेखाली मोठा निधी मिळतो, तसेच नफा फंडातील ५ टक्के निधी दलित वस्ती सुधारणेसाठी उपलब्ध होत असतानाही, दलित वस्तीतील कामे चांगल्या प्रतीची केली जात नाहीत. नगरपालिकेतील अभियंता कोणत्याही कामाची पाहणी करत नाहीत, तसेच त्यांच्या हाताखाली असलेल्या देखभाल कर्मचाऱ्यांना कामाच्या प्रतीबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे ठेकेदार कामे करतात आणि अधिकारी सही करून बिले अदा करतात. ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ अशा पद्धतीने व्यवहार होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

या गंभीर आरोपांना दुजोरा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था याचे उदाहरण देण्यात आले आहे. इतका निधी येऊनही शौचालयाची दुरुस्ती चांगल्या पद्धतीने केली जात नाही. शौचालयाचा दरवाजा खराब होऊन तो काढून बाहेर ठेवला आहे. दुरुस्ती होऊन एक वर्ष झाले नसतानाच ही स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीसाठी जबाबदार अधिकारी आणि मुजोर ठेकेदारांवर प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवालही निवेदनातून विचारण्यात आला आहे. या प्रकरणी तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अन्यथा गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा बाळासो भरमा कांबळे यांनी दिला आहे. या निवेदनामुळे मुरगूड नगरपालिकेच्या कामकाजावर आणि दलित वस्तीतील कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




