महाराष्ट्र ग्रामीण

रिपाई (आ) पक्षाने निपाणी-फोंडा मार्गावरील खराब रस्त्याच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन!

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाने निपाणी-फोंडा मार्गावरील खराब रस्त्याच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदारावर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आपला निषेध व्यक्त केला.

भ्रष्टाचारावर थेट हल्ला
पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निपाणी-फोंडा मार्गाच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असले, तरी अवघ्या दोन वर्षांतच रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की, वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. या दुरावस्थेसाठी जितेंद्रसिंग कंपनी आणि राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभाग हे दोघेही जबाबदार असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन
यमगे आणि सुरुपली गावांच्या दरम्यान रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाळासो कांबळे, विक्रम कांबळे, संतोष पवार, शुभम कांबळे, रेखाताई कांबळे, अजित कांबळे आणि अनिल पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अपघातांमुळे नागरिक त्रस्त
या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तरीही अधिकारी आणि कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पक्षाने केला. जोपर्यंत अधिकारी किंवा कंत्राटदाराच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू होत नाही, तोपर्यंत रस्त्याची परिस्थिती सुधारणार नाही, असे संतप्त मत आंदोलकांनी व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभाग टक्केवारी घेऊन नामानिराळा झाला असून, कंत्राटदार फक्त खड्डे बुजवून वेळ मारून नेत असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यापुढेही या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत राहील, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button