गोटे (पन्हाळा) येथे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत; बेशुद्ध व्यक्तीला नदीतून बाहेर काढून जीव वाचवला!

पन्हाळा (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशाच परिस्थितीत, आज १९ ऑगस्ट रोजी पन्हाळा तालुक्यातील गोटे गावात एका व्यक्तीला वेळेवर मदत करून त्यांचा जीव वाचवण्यात आला. शशांक श्रीकांत नाईक (गोटे, ता. पन्हाळा) यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागल्याने ते घरीच बेशुद्ध पडले. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन दलाने तत्काळ धाव घेत त्यांना सुरक्षितपणे नदीपात्रातून बाहेर काढले.
शशांक नाईक यांच्या घरी मदत पोहोचवणे कठीण असल्याने, बचाव पथकाने बोटीचा वापर करण्याचे ठरवले. कुंभी नदीच्या पात्रातून बोटीच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना तातडीने १०८ ॲम्बुलन्सद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या मदतकार्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या के.डी.आर.एफ. पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकातील जवान ओंकार पाटील, साहिल कोळी, विशाल पाटील आणि संकेत मोळे यांनी जीवावर उदार होऊन मदत केली. त्याचबरोबर, कळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीही या बचावकार्यात मोलाची कामगिरी बजावली. पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी मदतकार्य पोहोचणे कठीण असतानाही, या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचवता आला. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.