कौटुंबिक वादातून मित्राची हत्या, शहापूरमध्ये खळबळ

शहापूर (सलीम शेख): पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राची वरवंट्याने डोक्यात मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहापूर येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
शहापूर येथील गणेशनगर, गल्ली नंबर तीन येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद अण्णासो घुगरे (वय ३२, रा. शहापूर) आणि आरोपी संतोष दशरथ पागे ऊर्फ नागणे (वय ३८) हे दोघे मित्र होते. १६ ऑगस्टच्या रात्री १० वाजेनंतर संतोष पागे यांच्या राहत्या घरी त्यांच्यामध्ये वाद झाला. संतोष पागे यांना त्यांचा मित्र विनोद घुगरे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून संतप्त झालेल्या संतोष पागे यांनी दगडी वरवंट्याने विनोद घुगरे यांच्या डोक्यावर आणि कपाळावर जोरदार प्रहार केले, ज्यात विनोद गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मृताची बहीण वनिता सचिन बोरगे यांनी पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणात संतोष पागे यांच्यासोबत त्यांचा भाऊ संजय दशरथ पागे (वय ३६) यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
सहाय्यक फौजदार मोहिते यांनी फिर्यादीची तक्रार नोंदवली असून, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे शहापूर परिसरात खळबळ उडाली आहे.