महाराष्ट्र ग्रामीण

कृष्णा नदीत माळ्यात अडकलेल्या मगरीला जीवदान

चिंचवाड, (ता. शिरोळ): (सलीम शेख): येथील कृष्णा नदीच्या पात्रात सोमवारी सकाळी मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या मगरीला स्थानिक प्राणीमित्रांनी व वन्यजीव बचाव पथकाने यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. या घटनेमुळे नदीकाठच्या रहिवाशांमध्ये मगरींच्या वाढत्या वावराबाबत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी सकाळी मासेमारीसाठी नदीत लावलेल्या जाळ्यात एक मोठी मगर अडकल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर विजय ठोमके, हनमंत न्हावी-हडपद, सुशांत ठोमके, युवराज नंदीवाले, शशिकांत ठोमके, सुनील ठोमके, महेंद्र सातपुते, सुहास मोहिते, आणि अक्षय मगदूम या स्थानिक प्राणीमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने मगरीला जाळ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले.
या बचावकार्यात वनविभागाचे वनपाल संजय कांबळे, शिरोळ तालुक्याचे वनरक्षक अरुण खामकर, हातकणंगलेचे वनरक्षक मंगेश वंजारे आणि कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य उपस्थित होते. मगरीला सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर तिला कोल्हापूर जिल्हा वन्यजीव बचाव पथकाच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे कृष्णा नदीच्या पात्रात मगरींचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button