महाराष्ट्र ग्रामीण
पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रक उलटला, जीवितहानी नाही!

शिरोली एमआयडीसी कोल्हापूर (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा येथे आज सकाळी आठ वाजता रंगाच्या बादल्या घेऊन जाणारा एक ट्रक उलटला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बंगळूरकडे जाणारा ट्रक (क्र. के.ए. १८ बी ७८०३) नागाव फाटा येथील कोल्हापूर स्टील कंपनीसमोर पोहोचला असता अचानक त्याचा ‘हब’ तुटला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक सेवा रस्त्यावर उलटला.
अपघात घडला तेव्हा सेवा रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी ट्रक उलटण्याची ही तिसरी घटना आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झालेली नाही.