मोहन सातपुते यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान!

उचगाव : (सलीम शेख) उचगाव, ता. करवीर : एच.आय.व्ही./एड्स जनजागृती आणि इतर सामाजिक कार्यांमध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल उजळाईवाडी (ता. करवीर) येथील मोहन गणपती सातपुते यांना हिंदुस्थानी युवक मित्र मंडळ, एन. डी. वाईगडे ग्रुप, उचगाव यांच्या वतीने ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि रुग्णवाहिकेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उचगावातील १५ निःस्वार्थ समाजसेवकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गेली १९ वर्षे सातपुते यांनी एच.आय.व्ही./एड्स, गुप्त रोग, क्षयरोग आणि कावीळ यांसारख्या रोगांबद्दल समाजामध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. महामार्ग मृत्युंजय दूत म्हणूनही त्यांची ओळख असून, नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही त्यांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच देहविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या या सर्वांगीण योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
याव्यतिरिक्त, स्वाभिमानी वाचन मंदिर आणि युवा क्रांती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनेही त्यांना ‘राज्यस्तरीय जनसेवा आरोग्य मित्र प्रेरणा’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, स्थलांतरित आणि असंघटित कामगारांसाठी ते नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करतात. त्यांच्या या समाजकार्यात युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रकल्प संचालक आणि सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.