उंचगाव बस थांब्यावर थांबत नसलेल्या रंकाळा-हुपरी एसटीला शिवसेनेचा ‘थांबा’

उंचगाव (सलीम शेख ) : रंकाळा-हुपरी बस उंचगाव आणि गडमुडशिंगी येथील बस थांब्यावर थांबत नसल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी स्वतः बस थांब्यावर जाऊन ही एसटी थांबवली आणि विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवले.
अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि प्रवाशांची तक्रार होती की, रंकाळा-हुपरी एसटी बस ठरलेल्या थांब्यावर थांबत नाही. यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना तासन्तास थांबून राहावे लागते. या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे कॉलेज आणि शाळेला जाण्यासाठी उशीर होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेत करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी राजू यादव यांनी एसटीला थांबवून विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यास सांगितले. तसेच त्यांनी एसटी महामंडळाला इशारा दिला की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करून या थांब्यावर बस थांबवणे आवश्यक आहे. अन्यथा, करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि एसटी अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेचे विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले आहे.