महालक्ष्मीच्या भक्तीतून ५० ग्रामस्थांनी मिळवली शक्ती, ६९४ दिवस न थांबता केली पदयात्रा

उजळाईवाडी (सलीम शेख): उजळाईवाडी , ता. करवीर येथील ५० हून अधिक ग्रामस्थांनी एक अनोखा संकल्प पूर्ण केला आहे. गेल्या ६९४ दिवसांपासून आणि सलग १०० आठवडे, हे सर्वजण मंगळवारी न चुकता उजळाईवाडीहून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापर्यंत पायी वारी करत आहेत. त्यांच्या या भक्तीमय आणि आरोग्यदायी प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भक्ती आणि आरोग्याचा अनोखा संगम
संतोष कदम, विनायक बागणे, संजय फडतरे आणि धनाजी रायजादे यांच्यासह एकूण ५० ग्रामस्थांनी २६ सप्टेंबर २०२३ पासून हा उपक्रम सुरू केला. दर मंगळवारी पहाटे ३:३० वाजता उठून, ४:१५ वाजता ते सर्वजण एकत्र चालण्यास सुरुवात करतात आणि ५:३५ वाजता महालक्ष्मी मंदिरात पोहोचतात. तिथे दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा पायी चालत उजळाईवाडीला परत येतात.
हा प्रवास त्यांनी केवळ धार्मिक श्रद्धेतूनच नव्हे, तर आरोग्याच्या फायद्यासाठीही सुरू केला. या अखंड पदयात्रेमुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मिळत आहे. विनायक बागणे आणि संतोष कदम यांनी सांगितले की, “आम्ही कोणताही खंड न पडता ही पदयात्रा सुरू ठेवली आहे. आता आमच्यासोबत ५० हून अधिक ग्रामस्थ आणि महिलाही या उपक्रमात सहभागी होत आहेत.”
शंभराव्या आठवड्याचा सोहळा
२० ऑगस्ट २०२५ रोजी या पदयात्रेचा १०० वा आठवडा पूर्ण झाला. या यशस्वितेबद्दल ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. या १०० आठवड्यांच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त, २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता, श्री समर्थ मंगल कार्यालय, उजळाईवाडी येथे महालक्ष्मी फोटो पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे उजळाईवाडीतील लोकांमध्ये भक्तीसोबतच आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. या सर्व ग्रामस्थांचे कौतुक होत असून, त्यांचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.