गोकुळ शिरगावमध्ये चिखलामुळे वाहतूक विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप उसळला!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : भगवती हॉलजवळील सर्व्हिस रोडवर १३ गाव प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या पाईपलाईनच्या खुदाईमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पसरली असून, सततच्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी, वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे.

या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्यावरील चिखल तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
हे काम मेघा इंजिनिअरिंग या कंपनीकडे कंत्राटी पद्धतीने सुरू असून, रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या खुदाईमुळे बाजूची माती रस्त्यावर येत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत गोकुळ शिरगावचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे यांनी प्राधिकरण अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.
“तात्काळ तात्पुरता रस्ता बंद करण्यात आला असून, मेघा इंजिनिअरिंग कंत्राटदारांना उद्या दुपारपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” प्राधिकरण पाणीपुरवठा अधिकारी गायकवाड यांनी सांगितले, “काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जाईल.”
स्थानिक प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले असले तरी, पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.




