दारूबंदी आंदोलनाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार!

गोकुळ शिरगाव– दारूबंदी आंदोलनाला विरोध करणाऱ्या आणि गावात चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दारूविक्रेते आणि त्यांचे बगलबच्चे स्वतःचे बेकायदेशीर धंदे वाचवण्यासाठी, दारूबंदीचे पवित्र काम करणाऱ्या महिला सन्मान परिषदेच्या सदस्यांवर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. या आरोपांना कोणतेही पुरावे नसून, हा केवळ या लोकांचा छुपा अजेंडा आहे.
हे लोक स्वतः गावातील हजारो कुटुंबांना दारू पाजून उद्ध्वस्त करत आहेत. तरुण पिढीला शिक्षणापासून आणि उज्ज्वल भविष्यापासून वंचित ठेवून ते आपली पोळी भाजून घेत आहेत. ज्या कुटुंबांचा संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाला, ज्या तरुणांचे भविष्य अंधारमय झाले, त्यांचे शाप आणि तळतळाट या लोकांना नक्कीच लागणार. कारण, दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून मिळवलेले हे कर्म याच जन्मी फेडावे लागणार आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आमच्यावर खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्यांचा कायदेशीर बंदोबस्त लवकरच केला जाईल. यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाईल.
आमचे आंदोलन शांततेच्या आणि कायद्याच्या चौकटीत सुरू आहे. आम्ही कोणत्याही गैरकृत्याला थारा देणार नाही. दारूबंदीच्या या लढ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याची बदनामी करणाऱ्यांना योग्य शासन होईल.
जनतेला आवाहन: अशा बेजबाबदार आणि स्वार्थी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या मनात काही शंका असल्यास, थेट ‘महिला सन्मान परिषदे’शी संपर्क साधा. गावाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, या आंदोलनात सहभागी व्हा.




