कागल दिवाण न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत: २.७६ कोटींची वसुली!

कागल (सलीम शेख ) : कागल दिवाण न्यायालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण १,४१७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या माध्यमातून तब्बल २ कोटी ७६ लाख ५९ हजार रुपयांची वसुली झाली. शनिवारी पार पडलेल्या या लोक अदालतीचे आयोजन कागल विधी सेवा समिती आणि कागल दिवाण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
यावेळी विविध प्रकारची प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात बँक, ग्रामपंचायत, बीएसएनएल आणि महावितरण यांच्याशी संबंधित १२३ दिवाणी आणि १५ फौजदारी प्रकरणांचा समावेश होता. याशिवाय, इतर १८० प्रकरणे देखील यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.
या लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश ए. बी. मडके यांनी काम पाहिले, तर अॅड. पी. व्ही. चव्हाण यांनी सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला एकूण १,१०२ प्रकरणे होती, त्यापैकी ४१७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
यावेळी सहन्यायाधीश प्रणिता पाटील, सरकारी वकील प्राजली पांढरे, अॅडव्होकेट सजोली मामूलकर, कागल वकील संघटनेचे अध्यक्ष ए. बी. पाटील, अडव्होकेट सांगावकर, संभाजी गस्ते, अमिषा तहसीलदार, रामचंद्र चौगुले आणि संदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




