कागलमध्ये महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

कागल (सलीम शेख ) : केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाअंतर्गत, २० सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय, कागल आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांचे आरोग्य, जनजागृती आणि पोषणासंदर्भात विविध सेवा पुरवण्यात आल्या.
या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या.
स्तन, गर्भाशय आणि तोंडाच्या कर्करोगाची तपासणी. मधुमेह, प्रयोगशाळा चाचण्या, क्ष-किरण (X-ray), ईसीजी, कुष्ठरोग, क्षयरोग, दंत तपासणी, नेत्र तपासणी आणि हृदयरोग तपासणी. ॲनिमिया आणि गरोदर मातांची विशेष तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात आली.
शिबिरामध्ये तपासणीसोबतच आवश्यक औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरिता थोरात यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचे आणि अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी ‘निक्षयमित्र’ म्हणून स्वेच्छेने नोंदणी करण्याचे आवाहनही केले.
या शिबिरामध्ये कोल्हापूर येथील स्वास्तिक हॉस्पिटल आणि कॅन्सर हॉस्पिटल यांनी सहभाग घेऊन तपासणी केली. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यमित्रांनी आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्डसाठी लाभार्थींची नोंदणी केली. कागल शहर आणि ग्रामीण भागातील एकूण ३१९ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले.
या शिबिराच्या यशामध्ये डॉ. प्रियंका किल्लेदार, डॉ. सुलभा पाटील, दयानंद पाटील, भारती चौथे, सिमा शेवाळे, विजय कोळी, सुरेश पाटील, प्रकाश पोवार, अरुण कांबळे, आणि गणेश गोंधळी यांसह रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर यांनी केले, तर आरोग्य निरीक्षक आर. पी. दांगट यांनी आभार मानले.




