महाराष्ट्र ग्रामीण

महसूल पंधरावड़ा आदेशानुसार भड़गाव गावातील पाणंद रस्ते नोंद व खुले करा

कागल प्रतिनिधी (बाळासो कांबळे): कागल तालुक्यातील भडगाव गावात महसूल पंधरावडा अंतर्गत पाणंद रस्ते खुले करण्याची व त्यांची नोंदणी करण्याची मागणी जोर धरत आहे. शासनाच्या नवीन जीआरनुसार, पाणंद रस्त्यांची नोंदणी करून ते खुले करण्याचे आदेश प्रत्येक गावाला देण्यात आले आहेत. यामुळे शेतीत ये-जा करणे सोपे होणार असल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.

भडगाव गावातील शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यांविषयी अधिक माहिती नसल्यामुळे, अर्ज कुठे करायचा आणि कोणाकडे जायचे याबद्दल त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा शिवसेना शाखा, भडगाव यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी २०१३ पासून तहसीलदार, कागल आणि जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना अनेक निवेदने दिली आहेत. तसेच, शिवसेना कोल्हापूरचे माजी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनीही लोकाग्रहास्तव पत्रे दिली आहेत. या प्रयत्नांमुळे काही पाणंद रस्ते खुले झाले, पण त्यांची नोंदणी अद्याप झाली नाही. या अनुषंगाने, अनेक नागरिकांनी काही महत्त्वाच्या पाणंदींची नोंदणी व त्यांना खुले करण्याची तोंडी मागणी केली आहे.

देवणे पाणंद: नकाशावरील व नकाशापासून पुढे नोंद करणे. गुरव पाणंद: अर्धी पाणंद खुली करणे. कोडी पाणंद: गायरान जवळची अतिक्रमणमधून खुली करणे. भारमल माळ: १० फुटी रस्ता खडकगोंड पाणंदला जोडून नोंद करणे. आडवा व उभा बारवाडे माळ: दोन्ही बाजूने अडवलेले रस्ते खुले करून नोंद करणे. म्हांगोरे फडाची पाणंद: नोंद करणे. मळा पाणंद: नवीन रस्ता तयार करणे. इनाम उभी किंवा आडवी पाणंद: नोंद करणे. मळगे-भडगाव सीमा पाणंद: नोंद करणे. मळगे माळ पाणंद: खडकगोंड पाणंदला जोडून नोंद करणे.

या मागणीनुसार शिवसेना विभागप्रमुख (माजी उपसरपंच) दिग्विजय पाटील, शाखाप्रमुख हरि सुतार, शेतकरी आनंदा बारवाडे, भगवान म्हांगोरे, कुंडलिक भारमल आणि संग्राम खतकर यांनी ग्रामसेवक रणजीत विभुते आणि तलाठी शहाजी ढेरे यांना लेखी निवेदन दिले आहे. दिग्विजय पाटील यांनी शासकीय जीआरनुसार गावात ग्रामसभा बोलावण्याची आणि शेतकऱ्यांच्या संमतीने पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच, या झालेल्या कामाचा ठराव आणि अहवालाची प्रत मिळावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. या मागणीची दखल घेऊन लवकरच पाणंद रस्ते खुले करून त्यांची नोंदणी केली जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button