नेमबाजीत शिवेंद्र पाटील याची दिल्लीसाठी निवड!

कागल (सलीम शेख ) : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोगनोळी येथील शिवेंद्र महेश पाटील याने आपल्या अचूक नेमबाजी कौशल्याने उज्वल यश संपादन केले असून, त्याची दिल्ली येथे होणाऱ्या देशपातळीवरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत देशभरातील नामांकित आणि अनुभवी नेमबाजांमध्ये प्रखर स्पर्धा पाहायला मिळाली. अशा कठीण स्पर्धेत शिवेंद्रने आत्मविश्वास, अचूकता आणि नेमबाजीची कला सिद्ध करत आपली वेगळी छाप पाडली. त्याचे हे यश कोगनोळी गावासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. शिवेंद्र पाटील याने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि कुटुंबियांचा ठाम पाठिंबा यामुळे हे यश मिळवले आहे. त्याला ‘परफेक्ट शुटिंग’ संस्थेचे प्रशिक्षण आणि लक्षवेधचे सचिव युवराज चौगुले तसेच वडील महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोगनोळी पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दिल्लीतील स्पर्धेतही तो यशाची परंपरा कायम ठेवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




