अभिमानास्पद यश! कागलच्या सुपुत्राचं जागतिक स्तरावर संशोधन प्रकाशित!

कागल (सलीम शेख ) : कागलचे सुपुत्र आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात एम.डी. मेडिसिन विभागात दुसऱ्या वर्षात कार्यरत असलेले डॉ. प्रणव देवानंद पवार यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये आढळणाऱ्या मधुमेह (Diabetes) आजारातील विषमता या विषयावर केलेल्या त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, हा संशोधन प्रबंध प्रतिष्ठित आणि नामांकित मासिक “Frontiers in Endocrinology” मध्ये प्रकाशित झाला आहे.
ग्रामीण आरोग्यासाठी डॉ. प्रणव पवार यांनी मागील केवळ १० महिन्यांच्या कालावधीत हे महत्त्वाकांक्षी संशोधन पूर्ण केले. यामध्ये त्यांनी जवळपास ८ ते १० हजार ग्रामीण लोकांची सखोल तपासणी केली.
त्यांच्या या अभ्यासात पुढील प्रमुख बाबींचा समावेश होता.
विविध वयोगट व स्त्री-पुरुषांमध्ये मधुमेह कधी आणि कसा होतो?
लहान वयात मधुमेह होण्यासाठी कारणीभूत असलेले जोखीम घटक (Risk Factors) कोणते?
मधुमेहानंतर पुढे उद्भवणाऱ्या गंभीर गुंतागुंती (Complications) कोणत्या?
निष्कर्ष झाले पेटंट, उपचारांना मिळणार नवी दिशा
केवळ १० महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तयार झालेला त्यांचा संशोधन प्रबंध थेट जागतिक स्तरावरील “Frontiers in Endocrinology” या संस्थेकडे पाठविण्यात आला होता. संस्थेने प्रबंधाची गुणवत्ता आणि महत्त्व ओळखून तो तत्काळ मान्य करत आपल्या मासिकात प्रकाशित केला आहे.
या यशाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या संशोधनातून प्राप्त झालेले निष्कर्ष डॉ. प्रणव पवार यांच्या नावावर पेटंट करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मधुमेहाच्या रुग्णांना उत्तम उपचारासाठी मोठी मदत होणार आहे आणि ग्रामीण आरोग्य सेवेसाठी हे संशोधन नवा मार्गदर्शक ठरणारे आहे.
डॉ. प्रणव पवार यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, हे यश केवळ अंबाजोगाई किंवा कागलसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागातील समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या अभ्यासाला नवी प्रेरणा मिळणार आहे.




