औद्योगिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरमध्ये बैठक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतींमधील समस्या सोडवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्योगांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रयत्नांमुळे ही बैठक शक्य झाली.
या बैठकीत उद्योगमंत्र्यांनी विविध सरकारी विभागांना कोल्हापूरमधील कारखानदारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. या बैठकीत स्मॅक (SMACK), गोशिमा (GOSHIMA) आणि कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.शिवाजी उद्यमनगरमधील बांधकामासाठी वाढीव एफएसआय (FSI) मंजूर करावा, तसेच विद्युत वाहिन्या जमिनीखालून (अंडरग्राउंड) टाकाव्यात आणि चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करावेत, अशी मागणी करण्यात आली.शिरोलीमधील कचरा डेपो हटवून ती जागा ईएसआय (ESI) हॉस्पिटलसाठी द्यावी, अशी सूचना उद्योगमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला केली. गोकुळ शिरगावमध्ये फायर ब्रिगेड स्टेशन उभारणीला मान्यता देण्यात आली. तसेच, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे तुटणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
या बैठकीत गोशिमाचे चेअरमन सुनील शेळके, संजय देशिंगे, स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, बदाम पाटील, शेखर कुसाळे, दीपक चोरगे, स्वरूप कदम आदी उपस्थित होते. उद्योगमंत्र्यांनी या सर्व समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.




