पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यांचा निषेध म्हणून भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हॉटेलमध्ये दाखवू नका: संजय पवार!

कोल्हापूर (सलीम शेख ) : रविवार, दि. १४ रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला कोल्हापूरमधील सर्व हॉटेल मालकांनी आणि व्यवसायिकांनी आपल्या आस्थापनांमध्ये दाखवू नये, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केले आहे. देशांतर्गत पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्यांमध्ये अनेक वेळा भारतीय नागरिक आणि जवानांनी बलिदान दिले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे आणि तो पाहणे हे देशभक्तीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात, काही महिन्यांपूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक माता-भगिनींनी आपले कुंकू गमावले, तर त्यापूर्वी पुलवामा येथे आरडीएक्स हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या घटना ताज्या असताना पाकिस्तानसोबत सामना खेळणे योग्य नाही. या सामन्यावर बहिष्कार टाकून प्रत्येक भारतीयाने आपली देशभक्ती सिद्ध करण्याची ही योग्य संधी आहे.
‘भारत सरकारने आणि संबंधित क्रिकेट बोर्डाने हा सामना खेळायचा की नाही, हे निश्चित करणे गरजेचे होते. मात्र निवडणुकीपूर्वी प्रत्येक गोष्टीचा लाभ उठवण्यासाठी हे सत्ताधारी सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत,’ असे पवार यांनी म्हटले आहे. जे सरकार स्वतःला कडवट हिंदुत्ववादी म्हणवून घेते, तेच देशविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला प्रोत्साहन देत आहे, अशी टीका त्यांनी केली.
त्यांनी सर्व क्रिकेटप्रेमींना आणि हॉटेल व्यवसायिकांना विनंती केली आहे की त्यांनी उद्याच्या होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकावा आणि कोणत्याही हॉटेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सामना दाखवू नये. त्यांनी नागरिकांना देशाचा सन्मान, अभिमान जपण्याचे आवाहन करत, पाकिस्तानसोबतचा सामना पाहणे योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्याची गरज असल्याचे सांगितले.
हे प्रसिद्धीपत्रक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार आणि सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिले आहे.




