संविधानाला महामानवंदना देऊन कोल्हापूरचा विश्वविक्रम!

प्रतिनिधी : (बाळासो कांबळे) कोल्हापूरमध्ये भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अश्वघोष आर्ट अँड कल्चरल, केंद्रीय सांस्कृतिक विभाग, सामाजिक न्याय विशेष सहाय्य महाराष्ट्र शासन, बार्टी पुणे आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौकातील भव्य मैदानात हा सोहळा पार पडला. यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून २० भाषांमधील १६०० गायकांनी एकाच मंचावर भारतीय संविधानाला महामानवंदना दिली.
या अभूतपूर्व कामगिरीची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनने घेतली असून, या ऐतिहासिक क्षणाची नोंद विश्वविक्रम म्हणून करण्यात आली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते कबीर नाईकनवरे यांना या विश्वविक्रमाचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना रामदासजी आठवले यांनी “कोल्हापूर आहे भारताचे टोक, म्हणून आहोत ‘हम भारत के लोक'” असे म्हणत संविधानप्रेमींची मने जिंकली. त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत “या देशाच्या दुश्मनांचा आम्ही सर्वांनी काढला आहे काटा” असेही विधान केले. संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाला त्यांनी सर्वोच्च मान दिला. त्यांनी कबीर नाईकनवरे यांच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर, आमदार राजेशजी क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, तसेच बार्टी पुणे, जिल्हाधिकारी कार्यालय आणि रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रवीणजी बनसोडे यांनी केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर ही संस्था होती, ज्यांनी उपस्थित हजारो संविधानप्रेमींसाठी मोफत अन्नछत्राचेही आयोजन केले होते.




