महाराष्ट्र ग्रामीण

अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई, ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ): कोल्हापूर पोलिसांनी अवैध व्यवसायांवर केलेल्या कारवाईमध्ये, जिल्ह्यात हातभट्टीची दारू तयार करणारे ७ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३,२१,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कंजारभाट वसाहत, साईनगर, कणेरीवाडी; माणगाववाडी, तालुका हातकणंगले; आणि कंजारभाट वसाहत, मोरेवाडी, कोल्हापूर येथे छापे टाकले.
छाप्यांदरम्यान, पोलिसांनी ३,४०० लिटर कच्चे रसायन, ९०० लिटर पक्के रसायन, आणि ४७० लिटर तयार हातभट्टीची दारू जप्त केली. याव्यतिरिक्त, एक ॲक्टिव्हा मोपेड गाडी आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.


या प्रकरणी पोलिसांनी ११ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये कंजारभाट वसाहत, साईनगर येथील पाच महिला आरोपींचा समावेश आहे, ज्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंजारभाट वसाहत, मोरेवाडी येथील चार आरोपींवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, माणगाववाडी येथील दोघांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, आणि इतर अनेक पोलीस अंमलदार सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button