कारमधून दारू वाहतूक – LCB आणि लक्ष्मीपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई, 9 लाखांपेक्षा अधिक माल जप्त!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लक्ष्मीपूरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा इसमांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹९,१५,५५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माळकर तिकटी महानगरपालिका रोडवर सापळा रचून टोयोटा ग्लांझा (क्र. MH-07-AS-2267) ही संशयित कार थांबविण्यात आली. तपासणीदरम्यान गाडीत देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी गाडीत असलेल्या पुरुषोत्तम जयप्रकाश राणे (वय ४०) व संदेश संदीप राणे (वय ३३, रा. राणेवाडी, देवगड, ) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ₹९३,३००/- किंमतीची देशी व विदेशी दारू तसेच ₹८ लाख किंमतीची टोयोटा ग्लांझा कार, असा एकूण ₹९,१५,५५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दारू वाहतूक करण्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या दारू वाहून नेत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही दारू लक्ष्मीपूरीतील रोहीत वाईन्स मधून घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, अमित सर्जे, युवराज पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदिप पाटील तसेच लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्याचे अंमलदार अबीद मुल्ला, संतोष कुंभार व प्रितम मिठारी यांनी केली.




