तारदाळच्या वीरपत्नीचा नवा शौर्यगौरव: लेफ्टनंट प्रियांका खोत यांचे सैन्यात पदार्पण!

कोल्हापूर तारदाळ (सलीम शेख ) : शौर्य आणि देशभक्तीचा वारसा जपत तारदाळ गावाच्या सुपुत्रीने, शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नी प्रियांका खोत यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू होऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या पतीच्या अतुलनीय त्यागाचा सन्मान करत आणि त्यांच्या शौर्याला सलाम करत त्यांनी केलेल्या या कठोर परिश्रमामुळे तारदाळसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

प्रियांका खोत यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांना नुकतेच ग्रामपंचायत चौक, तारदाळ येथे एका भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, अनेक मान्यवरांनी त्यांची उपस्थिती लावून त्यांना सन्मानित केले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला उपस्थित खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आजी-माजी लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कुटुंबीय आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण परिसर अभिमान, प्रेरणा आणि देशभक्तीच्या भावनेने भारून गेला होता.
यावेळी बोलताना, एका मान्यवराने सांगितले की, “प्रियांका यांनी आपल्या शौर्यवान पतीच्या परंपरेला न्याय देत स्वतः भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश केला आहे. ही घटना केवळ तारदाळसाठीच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.”
प्रियांका खोत यांचे हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असून, त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि निर्धाराचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. शहीद निलेश खोत यांच्या शौर्यगाथेला त्यांच्या पत्नीने दिलेल्या या समर्पणाने एक नवा अध्याय जोडला गेला आहे.




