महाराष्ट्र ग्रामीण

मराठी अभिनेता किरण माने यांच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे वादंग, भाजपची पोलिसांत तक्रार!

मुंबई (कोटा न्यूज नेटवर्क): प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या ‘फेसबुक’ पोस्टमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी नेपाळमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ‘भक्तडुक्कर पिलावळींनो, रंगा, बिल्ला, अनाजीपंत…’ असा आक्षेपार्ह मजकूर वापरल्यामुळे भाजपने त्यांच्याविरोधात तीव्र आक्षेप घेतला आहे. नाशिकमध्ये भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात माने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

किरण माने यांनी ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, “भक्तडुक्कर पिलावळींनो, नेपाळ बघताय नं? आपल्याकडे फरक इतकाच असेल की, रंगा बिल्ला अनाजीपंतासोबत तुम्हीही पिसले जाणार. सुट्टी नॉट.” या पोस्टमध्ये त्यांनी वापरलेले शब्द भाजप समर्थकांना आणि देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तींना उद्देशून असल्याचे मानले जात आहे. माने यांच्या या पोस्टवर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमधील भाजप नेते सागर शेलार यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, माने यांची पोस्ट समाजात द्वेष, असंतोष आणि राजकीय गटांमध्ये वैमनस्य निर्माण करू शकते. यामुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. या वादग्रस्त पोस्टमुळे माने यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या वादामुळे किरण माने यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली आहे. या संदर्भात त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. ते म्हणाले, “मला खुनाची धमकी दिली गेली. अर्थात हा फोन मी प्रसिद्ध करणार नाही कारण समाजात प्रक्षोभ होईल असे तो बोलला आहे. २४ सेकंदात मी फोन कट केला.” किरण माने यांनी म्हटले आहे की, “तलवारीच्या टोकावर जीव तोलून धरलेल्या शिवरायांचा आणि पेनाच्या टोकाने मनुवाद फाडणाऱ्या भीमरायाचा मी चेला आहे. मला जर काही झाले तर मी समाजासाठी निधड्या छातीने सामोरा जाईन.” किरण माने हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि अनेकदा ते सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मते मांडत असतात. आताच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button