मुरगूडमध्ये वाढत्या चोरीच्या घटना; फेरीवाल्यांची नोंदणी करून गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी!

मुरगूड (बाळासो कांबळे): मुरगूड शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरामध्ये येणाऱ्या आणि फिरून व्यवसाय करणाऱ्या सर्व फेरीवाले आणि भंगार व्यावसायिकांची नोंदणी करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणी शहरातील नागरिकांनी पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात येणाऱ्या अनेक फेरीवाले, भंगार व्यावसायिक, आणि वस्तू विकणाऱ्या व्यक्तींची कोणतीही नोंद नसते. यामुळे त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत आहेत. या पार्श्वभूमीवर, शहरात प्रवेश करणाऱ्या अशा सर्व व्यक्तींची ओळखपत्रे तपासणे आणि त्यांची नोंद मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्याकडून कोणताही धोका उद्भवणार नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात बंद घरे फोडून होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, या चोरींचा तपास अजूनही पूर्ण झालेला नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावर तात्काळ कार्यवाही करून शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी प्रा. संभाजीराव अंगज, प्रा. सुनील मंडलिक, शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, विनायक मुसळे, तानाजी भराडे, समीर हळदकर, जावेद मकानदार, प्रफुल्ल कांबळे, रघुनाथ बोडके, जगदीश गुरव, विशाल भोपळे, विनायक मेटकर, संकेत शहा, प्रकाश पारिषवाडकर, जितेंद्र मिठारे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.



