महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूडमध्ये भटक्या कुत्र्यांवर अखेर कारवाई सुरू! नसबंदी मोहिमेने नागरिकांमध्ये दिलासा!

कागल प्रतिनिधी (बाळासो कांबळे): मुरगूड शहरातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून चालू असलेला भटक्या कुत्र्यांचा त्रास अखेर चर्चेत आला असून नगरपालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीपासून कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेची सुरुवात केली आहे. याद्वारे मादी कुत्र्यांना पकडून पशुवैद्यकांच्या उपस्थितीत उपचार व नसबंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील विविध भागांत — कंपोस्ट खड्डा परिसर, चिमगाव रोड, कापशी रोड, एसटी स्टँड परिसर तसेच अनेक गल्ली-बोळांमध्ये भटक्या कुत्र्यांचे मोठे कळप फिरताना दिसतात. या कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात धोक्यांना सामोरे जावे लागत होते.

भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर अनेकदा हल्ले झाले आहेत.

  • कुत्र्यांच्या चावल्यामुळे काही लोकांना गंभीर जखमा झाल्या तर काहींचा मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे.

  • टू व्हिलरवरून प्रवास करणाऱ्यांचा पाठलाग करून झालेल्या धावपळीत अपघातांच्याही घटना घडल्या आहेत.

  • लहान मुले, महिला, वयोवृद्ध व सायकलस्वार हे या त्रासाला जास्त बळी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुरगूड नगरपालिका हद्दीमध्ये अंदाजे 500 पेक्षा जास्त भटकी कुत्री असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिकांनी वारंवार निवेदने देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावरही या संदर्भातील हल्ल्यांचे व्हिडिओ वारंवार दिसत होते. आता मात्र प्रशासनाने हालचाल करीत मोहिमेला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. नसबंदी मोहिमेचा हा प्रारंभ पुढील काळात किती परिणामकारक ठरेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मोहिमेला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, “उशिरा का होईना पण योग्य पाऊल उचलले गेले,” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button