महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूडमध्ये गांजा विक्रेता जेरबंद, पण मुख्य सूत्रधार मोकाटच! अवैध धंद्यांवर वचक बसवणार कोण?

मुरगूड (बाळासो कांबळे (कागल तालुका): कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (Local Crime Investigation Team) मुरगूड (ता. कागल) येथे गांजा विकताना पकडलेल्या प्रमोद पांडुरंग भोई याचा कुस्ती अथवा पैलवान क्षेत्राशी काहीही संबंध नाही, असे मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर प्रमोद भोई याचा पैलवान क्षेत्राशी संबंध असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, मात्र ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे शेणवी यांनी सांगितले.

शहरातील गल्ली बोळातून गांजा सर्रास विकला जात असताना पोलिसांना तो सापडत नाही, अशी परिस्थिती आहे. इतकंच नव्हे तर, मटका, तीन पत्ती यांसारखे जुगाराचे अवैध धंदे खुलेआम चालू असताना कोणीही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत, अशी तक्रार नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, प्रमोद भोई याच्या गुन्हेगारी कारवाया आणि त्याच्या कथित पैलवान क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या संबंधामुळे पैलवानांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दगडू शेणवी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, मुरगूड शहरासह परिसरातील सर्व गांजा उच्चाटनासाठी पैलवान संघटना अग्रेसर (पुढाकार) राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पैलवान संघटना नेहमीच समाजातील सकारात्मक बदलांसाठी कार्यरत राहिली आहे. गांजा विक्रीसारख्या सामाजिक समस्यांविरुद्ध संघटना ठाम भूमिका घेईल, असे आश्वासन दगडू शेणवी यांनी दिले. या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही संघटनेने दर्शवली आहे.

यावेळी वस्ताद पांडुरंग पुजारी, युवराज सूर्यवंशी, प्रवीण मांगोरे, गणेश तोडकर, दादासो लवटे, सचिन मगदूम, शिवाजी मोरबाळे, पृथ्वीराज कदम, अमर उपलाने, सत्यजित चौगले, मयूर सावर्डेकर, राजू चव्हाण, तानाजी साळोखे, आनंदा लोखंडे, सुनील शेलार, समाधान बोते आदी प्रमुख मान्यवर आणि पैलवान उपस्थित होते. अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button