मुरगूड शहराचा पाणीप्रश्न ‘जैसे थे’! चार-चार पाण्याच्या टाक्या असूनही पाणीपुरवठा विषम; नियोजनातील त्रुटींवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह!

मुरगूड (प्रतिनिधी- बाळासो कांबळे): कागल तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या मुरगूड नगरपालिकेसमोर आज वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. नगरपरिषदेची जुनी कौलारू इमारत बदलून मुख्य बाजारपेठेला लागून नवीन इमारत उभी राहिली, जिच्यामागे बांधलेली जुनी मोठी पाण्याची टाकी एकेकाळी संपूर्ण शहराला पाणी पुरवत होती. मात्र, १९९० च्या दशकानंतर लोकसंख्या जसजशी वाढू लागली, नव्या कॉलनीज तयार होऊ लागल्या, तसतसे पाणी अपुरे पडू लागले.
मुरगूड हे कागल तालुक्यातील मोठे बाजारपेठ केंद्र आहे, तसेच येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. नोकरी-व्यवसायासाठी येथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शहराचा विस्तार झपाट्याने झाला आणि पाणीप्रश्न जटिल बनला. जुनी मोठी टाकी अपुरी पडू लागल्याने नगरपरिषदेने कापशी रोडला लागून दुसरी पाण्याची टाकी बांधली. तरीही पाण्याचा तुटवडा कायम राहिला. यानंतर मुरगूड पोलीस ठाण्याजवळ तिसरी टाकी बांधण्याचे नियोजन पूर्ण झाले. मात्र, या सगळ्या प्रयत्नांनंतरही पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन जमले नाही. काही भागांत मुबलक पाणी मिळत होते, तर काही भागांत पाण्याचा थेंबही मिळत नव्हता.
अखेरीस, लाल आखाडा व्यायामशाळेचा मोठा परिसर विचारात घेऊन नगरपरिषदेने चौथी टाकी बांधण्याचे नियोजन केले आणि ती आता कार्यरत आहे. अशाप्रकारे, मुरगूड शहरात सध्या चार-चार पाण्याच्या टाक्या कार्यरत असूनही, शहराला एकसारखा पाणीपुरवठा होत नाही. काही ठिकाणी मुबलक तर अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येते. विषम पाणीपुरवठ्याला जबाबदार कोण? असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत. टाक्या बांधताना जी पाईपलाईन बसवली, ती वाढत्या शहराचा विचार करून योग्य पद्धतीने बसवली गेली का? हाच मूळ मुद्दा आहे. योग्य पद्धतीचा अभ्यास न करता आणि वाढत्या शहराचा विचार न करता लहान व्यासाचे पाईप टाकले असावेत. परिणामी, अनेक ठिकाणी पाण्याचा दाब (प्रेशर) वाढल्यामुळे पाईपलाईनला गळती (लिकेज) होत आहे.
एका दिवशी पाणी व्यवस्थित येते, तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने येते, असे विसंगत चित्र शहरात आहे. या परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने मार्ग काढून संपूर्ण शहरात एकसमान पाणीपुरवठा कधी सुरू करायचा, असा नागरिकांचा सवाल आहे. चुकीच्या पद्धतीने योजना (प्लॅन इस्टिमेंट) करणाऱ्यांच्या गलथान कारभाराचा परिणाम आज अनेक ठिकाणी दिसत आहे. या पाणी समस्येवर प्रशासनाने १००% विलाज (उपाय) काढावा, अशी एकमुखी मागणी मुरगूडच्या जनतेतून जोर धरू लागली आहे. निवेदन देताना सिकंदर जमादार, प्रदीप वर्णे, राहूल कांबळे इ.



