मुरगूडमध्ये वीज बिलातील ‘अन्यायी वसुली’विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ‘महावितरण’ला इशारा; आंदोलन करणार

मुरगूड (बाळासो कांबळे): वीज बिलातील कथित ‘अन्यायी वसुली’ आणि गोरगरीब ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि जागृत मालक फाऊंडेशन यांच्या वतीने महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाला (मुरगूड) निवेदन देऊन देण्यात आला आहे. प्रतिनिधी बाळासो कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने मुरगूड महावितरण उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, पूर्वी ग्राहकांना तीन महिन्यांनी वीज बिल येत असताना स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क (१६%) हे तीन महिन्यांसाठी घेतले जायचे. मात्र, आता हीच बिले दर महिन्याला येत असताना, हे सर्व ‘इतर आकार’ प्रत्येक महिन्याला वसूल केले जात आहेत.निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्याच्या बिलांमध्ये वीज आकार आणि इतर आकार यांची तुलना केल्यास हे इतर आकार एकूण बिलाच्या ४० ते ४५% इतके आहेत. म्हणजेच, जवळजवळ निम्मे बिल केवळ ‘इतर आकारां’च्या नावाखाली वसूल केले जात आहे. या अन्यायी वसुलीवर तीव्र आक्षेप घेत, ही ग्राहकांची सरळसरळ लूट आहे का, असा सवाल निवेदनात विचारण्यात आला आहे.
कर्नाटकसारख्या शेजारील राज्यांमध्ये तुलनेने किरकोळ बिले येतात, याकडे लक्ष वेधून महाराष्ट्रातील महावितरण मनमानी पद्धतीने वसुली करत असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्योजकांचे लाड पुरवण्यासाठी ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा निर्णय म्हणजे गोरगरीब ग्राहकांवर दरोडा असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महावितरण ग्राहकांना गृहीत धरून ‘अन्यायी वसुली’ करत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
वीज बिल भरण्यास थोडा विलंब झाल्यास लगेच कनेक्शन तोडण्यासाठी येणे, ही प्रथा तात्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)’चे कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन छेडण्याची वेळ येऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. वीज बिल थकल्यास फोन करणे आणि वीज कनेक्शन तोडणे थांबवावे. तसा शासनादेश (जीआर) असल्यास त्याची प्रत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. या निवेदनावर बाळासो कांबळे, सिकंदर जमादार, प्रल्हाद कांबळे, विशाल आर्डेकर, बाळासो वाडेकर, आकाश शिरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.




