मुरगूड शहराच्या भरवस्तीमध्ये महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा धाडसी चोरी!

कागल (बाळासाहेब कांबळे): मुरगूड: मुरगूड शहरातील महालक्ष्मी नगर परिसरात एका बंद घरात धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंसह घरातील डीव्हीआरही लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरगूड शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी नगर येथील नंदकिशोर स्मार्थ यांच्या बंद घरामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातून मौल्यवान वस्तू आणि डीव्हीआर चोरून नेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या शेजारी राहणारे डॉ. राजन नाईक यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी परगावी गेलेल्या स्मार्थ यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ही चोरी उघडकीस आली. गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, सोन्याचे दागिने आणि पैसे चोरीला गेल्याची ही तिसरी मोठी घटना आहे. एकाच परिसरात महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, महालक्ष्मी नगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत. या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.




