मुरगूडमध्ये आंदोलन यशस्वी: नादुरुस्त रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली मुदत

प्रतिनिधी (बाळासो कांबळे) मुरगूड: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने मुरगूड-निपाणी-फोंडा मार्गावरील खराब रस्त्यांविरोधात दिलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग (राधानगरी) आणि संबंधित कंत्राटदार कंपनीने अखेर रस्त्यांच्या दुरुस्तीची दखल घेतली आहे. या संदर्भात, ९ सप्टेंबर रोजी मुरगूड येथे झालेल्या बैठकीत रस्ते दुरुस्तीसाठी निश्चित मुदत देण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये, आरपीआयचे कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे (दादा) यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा झाला आहे की, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा प्रश्न पडला आहे. यामुळे लोकांना प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१७ ते २०२५ या काळात झालेल्या अपघातांची आकडेवारी सादर करताना त्यांनी सांगितले की, या काळात १४९ जण किरकोळ जखमी झाले, ९१ जणांना गंभीर दुखापत झाली, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला.

यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता इंगवले साहेब यांनी कबूल केले की, रस्त्याचे काम अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. २०१९ ते २०२२ या काळात आलेल्या पूर आणि कोरोना महामारीमुळे कामात अडथळे आले. मात्र, आता कंत्राटदार कंपनी जितेंद्र सिंग देवगड कलाडगी हायवे प्रायव्हेट लिमिटेडला कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सक्तीचे निर्देश दिले आहेत. कामात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन इंगवले यांनी दिले.
या बैठकीत अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या:
- लिंगनूर-दाजीपूर रस्त्याचे काम: ११ ते १५ सप्टेंबर या काळात पूर्ण केले जाईल.
- काँक्रिट कामांसाठी निश्चित ठिकाणे: शिंदेवाडी पूल, मुरगूड बाजारपेठ, मुरगूड पेट्रोलपंप, निढोरी पूल, तसेच सुरुपाली आणि सूर्यवंशी पंपासमोरील पुलांची संरक्षण भिंत या ठिकाणी खराब झालेले रस्ते आणि पुलांची दुरुस्ती सुरू होणार आहे.
कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास, संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सर्किट बेंच कोल्हापूर येथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीमुळे खराब रस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.




