‘वारजे-पुणे’च्या पैगंबर शेख यांचे नाशिकमध्ये जोरदार भाषण; शरद पवारांन कडून कौतुक!

नाशिक (सलीम शेख ) : राजकारणापासून दूर असलेल्या पण शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक असलेल्या पैगंबर शेख यांनी नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या पहिल्याच भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. भाषणादरम्यान त्यांनी धर्मांध हिंदुत्ववादी आणि धर्मांध मुस्लिम या दोन्ही विचारसरणींवर परखडपणे टीका केली. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अशोक वानखेडे यांनीही कौतुक केले.
या कार्यक्रमात भाषण झाल्यानंतर पैगंबर शेख यांना थेट शरद पवार यांनी बोलावले. “तुम्ही कुठून?” असे पवारांनी विचारले असता, “वारजे-पुणे,” असे शेख यांनी उत्तर दिले. त्यावर, “छान बोलतात,” अशा शब्दांत पवारांनी त्यांचे कौतुक केले. राजकारणातील पहिल्याच भाषणात शरद पवार यांच्याकडून मिळालेल्या या प्रतिसादाने आपल्याला विशेष आनंद झाल्याचे शेख यांनी सांगितले.
या कार्यक्रमात बोलताना पैगंबर शेख यांनी धर्मांध विचारसरणींना विरोध करण्याची आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या या स्पष्ट विचारांचा उल्लेख शरद पवार आणि अशोक वानखेडे यांनीही आपल्या भाषणात केल्याने त्यांना अधिक समाधान वाटले.
या भाषणाची संधी त्यांना विकास लवांडे यांच्यामुळे मिळाली. चार दिवसांपूर्वी लवांडे यांनी त्यांना न विचारता त्यांचे नाव भाषणासाठी दिले होते. पैगंबर शेख यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या विकास लवांडे यांनी, ‘पोटच्या पोराने जणू काही मोठे काम केले’ अशा भावना व्यक्त करत माईकवरून त्यांचे कौतुक केले. या यशाचे श्रेय त्यांनी विकास लवांडे यांना दिले.
पैगंबर शेख यांच्या या पहिल्याच भाषणाने राजकीय वर्तुळात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून, त्यांच्या भाषणाची चर्चा सध्या सुरू आहे.



