गणपती विसर्जन मिरवणुकीत रंकाळ्यात पडलेल्या आजींना ‘व्हाईट आर्मी’च्या मुलींनी वाचवले!

कोल्हापूर (सलीम शेख ) : घरगुती गणपती विसर्जन सुरू असताना, रंकाळा तलावात पडलेल्या एका वृद्ध महिलेला ‘व्हाईट आर्मी’च्या दोन तरुण मुलींनी तात्काळ मदत करत त्यांचे प्राण वाचवले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज, दिनांक २ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणपती विसर्जन काळात रंकाळा परिसरात व्हाईट आर्मीचे जवान आपले कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी, एका वृद्ध महिला (आजी) अचानक रंकाळा तलावात पडल्या. ही बाब लक्षात येताच, व्हाईट आर्मीच्या साक्षी गोरे आणि सानिका पवार या दोन मुलींनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना पाण्याबाहेर काढले.
पाण्याबाहेर काढल्यावर आजी बेशुद्ध अवस्थेत होत्या, त्यामुळे दोन्ही मुलींनी त्यांना त्वरित सीपीआर (CPR) म्हणजेच कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला. त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीही धाव घेत आजींना तातडीने रुग्णवाहिकेतून सीपीआर येथील अपघात कक्षात दाखल केले. व्हाईट आर्मीच्या या दोन मुलींनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




