ट्रकच्या धडकेत तरुण फार्मासिस्टचा मृत्यू!

शिरोली (सलीम शेख ) : कोल्हापूर-सांगली राज्य महामार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुलाची शिरोली येथील मार्बल मार्केटसमोर हा अपघात झाला असून, यात दुचाकीस्वार प्रणव रावसो पाटील (वय २५, रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले) याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणव कोल्हापूर शहरात एका खासगी मेडिकल शॉपमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होता. गुरुवारी रात्री तो आपली ड्युटी संपवून दुचाकीवरून आपल्या गावी माणगाववाडी येथे परत जात होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पुलाची शिरोली येथील मार्बल मार्केटसमोर मागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत प्रणव गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने त्याच्या गावी शोककळा पसरली असून, पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.




