भडगांव स्मशानभूमीला कै. मारुती नारे यांच्या स्मरणार्थ स्वच्छता साहित्य भेट!

भडगांव: (प्रतिनिधी : बाळासो कांबळे) : येथील ग्रामपंचायत माजी सदस्य कै. मारुती नारे यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या कुटुंबीयांनी भडगाव येथील स्मशानभूमीसाठी स्वच्छता आणि अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे वाटप केले. या सामाजिक उपक्रमामुळे स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी असलेल्या त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे. भडगाव येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साधनांची कमतरता होती. काही दिवसांपूर्वी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कै. मारुती नारे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी सामाजिक कार्यकर्त्यांना स्मशानभूमीची साफसफाई करताना झाडाच्या फांद्या वापरून स्वच्छता करावी लागली.
ही अडचण कै. मारुती नारे यांचे चिरंजीव जोतिराम नारे (भाऊ मोटर ट्रेनिंग स्कूल) यांनी नेमकी हेरली. वडिलांच्या स्मरणार्थ एक चांगला उपक्रम म्हणून, त्यांनी स्मशानभूमीसाठी लागणारे उपयुक्त साहित्य दान करण्याचा निर्णय घेतला.
दान केलेल्या साहित्यात:
- झाडू
- बादली
- मग (Mag)
- पत्राच्या सुफल्या (केरकचरा गोळा करण्यासाठी)
हे सर्व साहित्य जोतिराम नारे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद कांबळे आणि अजित पाटील यांच्याकडे स्मशानभूमीसाठी सुपूर्द केले. यावेळी शिवसेना विभागप्रमुख जोतिराम नारे, माजी उपसरपंच दिग्विजय पाटील, युवक काँग्रेस तालुका प्रमुख अमर चौगले, सामाजिक कार्यकर्ते संग्राम भांडवले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. कै. मारुती नारे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी स्मशानभूमीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी उचललेल्या या चांगल्या पावलामुळे गावातून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.




