भुदरगड येथे जुगार अड्ड्यावर छापा; ४ जणांना अटक, १ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त!

शेणगांव (सलीम शेख) : शेणगांव ता. भुदरगड येथे पत्याचा जुगार खेळ खेळणाऱ्या ०४ इसमांना पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून ७,३६०/- रोख रकमेसह एकूण १,७९,३६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार , यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथके तयार करून कारवाई सुरू केली. पोलीस अंमलदार राजू कोरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजे शेणगाव, ता. भुदरगड गावचे हद्दीत, सणगर गल्ली परिसरातील शिवाजी विठ्ठल सणगर यांच्या शेतातील पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये काही इसम पत्याचे ‘पलास’ नावाचा जुगार खेळ खेळत आहेत.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने दिनांक १७/१०/२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. राजेश विठ्ठल देसाई, व.व. ३०, रा. म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
२. बबन गणपती सातपुते, व.व. ५६, रा. लोटेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
३. रविंद्र राजाराम लोहार, व.व.४६, रा. आकुर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
४. प्रविण मारूती कुंभार, व.व. ३८, रा. आकुर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
छापा पडल्याची चाहूल लागताच ०२ इसम पळून गेले. ताब्यात घेतलेले व पळून गेलेले सर्वजण ‘पलास’ नावाचा तीन पानी पत्याचा जुगार खेळ खेळत होते. चौकशीत समजले की, सदर पत्र्याचे शेड शिवाजी विठ्ठल सणगर, रा. शेणगाव यांचे मालकीचे असून, संजय एकल, रा. शेणगाव यांनी ते जुगार खेळ खेळण्यासाठी भाड्याने घेतले होते.घटनास्थळी ७,३६०/- रोख रक्कम, ०४ मोबाईल हॅण्डसेट, ०२ मोटर सायकली व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण १,७९,३६०/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
शेड मालक शिवाजी विठ्ठल सणगर, जुगार खेळासाठी शेड भाड्याने घेणारा संजय एकल, तसेच ताब्यात घेतलेले व पळून गेलेले इसम यांच्याविरूद्ध भुदरगड पोलीस ठाणे येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार संजय देसाई, सतिश सुर्यवंशी, राजू कोरे, समीर कांबळे, हंबीरराव अतिग्रे, अमित मर्दाने यांनी केली आहे.




